Searching...

Agadgaon Ahmednagar काळभैरव आगडगाव

एक आगळे वेगळे तिर्थस्थान एक सत्य

काळभैरव आगडगाव अहमदनगर 

(Agadgaon Ahmednagar)


श्री काळभैरवनाथ (Kal Bhairav Agadgaon)
    भैरवनाथांना शिवाचेच रूप मानतात. तसा पुराणात उल्लेख आहे. काशीखंडात त्याविषयी एक अध्यायच आहे. शैव परिवारातील एक देवता म्हणून भैरवनाथांचा उल्लेख आहे. शैव आगमनात भैरवांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. आठ भैरवांचा एक, असे त्यांचे आठ वर्ग होतात. या आठ वर्गांचे प्रमुख भैरव 'अष्टभैरव' या नावाने प्रसिद्ध आहेत. याशिवाय कालभैरव, बटुकभैरव ही भैरवनामेही प्रसिद्ध आहेत.




आगडगाव (Agadgaon)नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. नगरहून जाताना बुऱ्हाणनगर, कापूरवाडीवरून आगडगावला जाता येते. तसेच चांदबिबीच्या महालापासून 8 किलोमीटरवर अंतरावर हे गाव आहे. तेथे काळ भैरवनातांचे मंदिर अत्यंत पुरातन आहे. त्यावर शिलालेख किंवा पुरातन लिखित सामुग्री नाही. मात्र भव्य दगडांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्ती किंवा राक्षसांकडून बांधले असावे, हे मंदिर पाहताक्षणीच स्पष्ट होते. कारण सुमारे आठ ते दहा फूट लांबीच्या अखंड दगडांचे खांब, मोठ-मोठ्या थापशिळी याची साक्ष देतात. देवस्थानाजवळ निःस्पृह बाबांची गादी आहे. बाबा स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांची समाधी मंदिर परिसरात बांधण्याची पद्धत आहे. समाधीवर पादुका लावलेल्या असतात. अशा 24 पादुका तेथे आहेत. यावरून हे देवस्थान 24 पिढ्यांपूर्वीपासून असावे, असा अंदाज येतो.
मंदिराच्या गाभाऱ्यात काळ भैरवनाथ व जोगेश्‍वरी मातेच्या मूर्ती आहेत. दगडी घडीव व स्थानबद्ध या मूर्ती कधीही हलविता येत नाहीत. बाहेर सभामंडपीय मंदिरात कासवाची मूर्ती आहे. मंदिराच्या खांबांवर नागाचे चित्र कोरलेले आहे. या ठिकाणी सर्पदंश झालेल्या व्यक्तिला लिंबाच्या पाल्यात ठेवल्यास सापाचे विष उतरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची मुंडकी आहेत. आगडमल, देवमल व रतडमल अशी त्यांची नावे होती. या राक्षसांनी एकाच रात्रीत देवाच्या आज्ञेवरून हे मंदिर बांधले, अशी आख्यायिका आहे.
शेजारीच लिंबाचा मोठा वृक्ष आहे. त्यास विष्णू असे संबोधले जाते. या झाडाखाली उभे राहून अनेक भाविक देवाला नवस करतात. या झाडाचा पाला कडू लागत नाही आणि बहर येतो; परंतु लिंबोळी कधीच येत नाही.

भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी भव्य मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात. गावातील युवकांनी पुढाकार घेऊन तेथे विकासकामे सुरू केले आहेत. या देवस्थानावर आधारीत "शिवअवतार काळ भैरव' हा मराठी चित्रपटही तयार करण्यात आला आहे. काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात सर्वश्रुत आहे. ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्री शंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली. त्याप्रमाणे ते दंडकारण्यातून सोनारीकडे जात होते. सोनारी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्‍यातील गाव. तेथेही भैरवनाथांचे भव्य मंदिर आहे. सोनारीकडे जात असताना ते आगडगाव इथे थांबले. तेव्हापासून या ठिकाणी देवस्थान झाले.

भूताची यात्रा
भूत म्हटले की माणसांच्या अंगाला काटा फुटतो. शहारे उठतात; परंतु भुताची यात्रा हे आगडगावचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात अशी एकमेव ही यात्रा प्रसिद्ध आहे. काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री (सोमवारी रात्री) राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, असे सांगितले जाते. एकदा गावातील तेली गोपीनाथ कर्पे हे यात्रेच्या दिवशी आपली तेलाची घागर मंदिराजवळील दीपमाळीजवळ विसरले. त्यांच्या हे सोमवारी रात्री लक्षात आले. ते मंदिराकडे आले, तेव्हा त्यांना तेथे सर्व भुते नाचताना दिसले ते घाबरले; परंतु देवाने त्याला दर्शन देऊन ती घागर आणून दिली व ही हकिगत कुणालाही सांगू नकोस, असे सांगितले. कर्पे यांनी हे बऱ्याच दिवस मनातच ठेवले; परंतु नंतर हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. ही कथा ग्रामस्थांबरोबरच गोपीनाथ कर्पे यांचे पणतू कोंडिबा कर्पे अद्यापही सांगतात.

भुतं खरंच येतात का? या शंका समाधानासाठी 1950 च्या दरम्यान गावातील काही युवकांनी सोमवारी रात्री म्हणजेच भुताच्या यात्रेच्या दिवशी तेथे भजन करण्याचे ठरविले. मंदिरात भजन सुरू करण्याच्या वेळेस त्यांचा पखवाद फुटला. तसेच मंदिरात वारा येण्यास विशेष जागा नसतानाही त्यांची बत्ती विझली. त्यामुळे काहीतरी चमत्कार आहे, असे समजून ते युवक गावात परतले. दुसरा प्रकार असाच झाला. गावात 1995 च्या दरम्यान पाणलोट विकास कामे सुरू होती. या वेळी पाणलोट विकास संस्थेच्या काही युवकांनी भुताच्या यात्रेच्या दिवशी तेथे चित्रपट दाखविण्याचे नियोजन केले; परंतु चित्रपट सुरू करतानाच वीज गेली. त्यामुळे ते घाबरले व गावात पळाले. 2004 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे शासनाने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. ही छावणी देवस्थान परिसरात होती. त्यावेळी काही युवकांनी ही यात्रा पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना ऐन बारा वाजण्याच्या दरम्यान झोपा लागल्या. या प्रकारांमुळे देवाची परीक्षा कुणी पाहत नाहीत. कारण तसे केल्यास गावावर संकटे येतील, अशी भाविकांची श्रद्धा आहे.



भैरवनाथ देवस्थान
     मुख्य गावापासून पश्चिमेला सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर श्री काळभैरवनाथांचे पुरातन मंदिर आहे. लांबून प्रारंभी मंदिराचा कळस दिसतो. जवळ गेल्यानंतर जुन्या बांधकामातील हे सुंदर मंदिर नजरेस भरते. हा परिसर अत्यंत रम्य आहे. मंदिर परिसरात असलेली चाफ्याची, चिंचांची, आंब्यांची झाडे भक्तांना थंड सावली देतात. मंदिराच्या उत्तरेला जवळच तलाव आहे.
पुरातन मंदिर
     कालभैरवनाथ मंदीर पायापासून चौकोनी आकारात बांधलेले आहे. मंदिराला दोन घुमट आहेत. दोन्हीवर कळस आहेत. आत गाभार आहे. द्क्षिनाभिमुख असलेल्या या मंदिराला एकच दरवाजा आहे. गाभार्याचा दरवाजा काहीस लहान आहे. त्यामुळे मंदिरात प्रत्येकाला वाकूनच जावे लागते. महिलांना गाभार्यात प्रवेश दिला जात नाही. सभामंडपाला चार दगडी खांब आहेत. त्यावर नागाचे शिल्प कोरलेले आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला त्या खांबाजवळ लिंबाच्या पाल्यात ठेवल्यास त्याचे विष उतरते. अशी भाविकांची श्रध्दा आहे. अनादिकालापसून भाविकांचे अनुभवही तसेच आहेत. गाभार्यात श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्ती उभ्या आहेत. त्या अत्यंत पुरातन व् दगडी आहेत. परंतु मुखवटा मेणाचा आहे.
     मंदीर परिसरात नि:स्पृह बाबांच्या २६ पादुका आहेत. त्यावरून हे मंदीर २६ पिढ्यांपूर्वीचे असल्याचा दाखला मिळतो. म्हणजेच हे मंदीर सुमारे २००० वर्षांपेक्षा जास्त काळचे असावे. असा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या पुढील बाजुस दरवाजावर तीन राक्षसांची दगडी मुंडकी आहेत. टपोरे डोळे, फुगलेले गाल उंच पिळदार मिशा, मोठा जबड़ा हे या मुंडक्यांचे वैशिष्ट्य आहे. आगडमल, रतडमल व देवमल अशी या तीन राक्षसांची नावे होती. या तिघांनी एकाच रात्रीत काशीवरुन पाणी आणून हे मंदीर बांधले असे सांगितले जाते. या राक्षसांच्या नावावरून आगडगाव, रतडगाव, देवगाव ही तीन गावे वसली आहेत.

मंदिराचा घुमट
     मंदिरात दोन घुमट आहेत. मोठा घुमट हा मुख्य मंदिराचा आहे. सुंदर बनविलेल्या या घुमटाला चौसष्ट कोन आहेत. संपूर्ण दगडी बांधकाम असल्याने व मोठमोठ्या दगडात बंध्ल्यामुळे तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर कळस असून कळसावर हँलोजन विजेचा दिवा बसवून मंदिर परिसरात प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरा घुमट हा सभामंडपाचा आहे. त्यावरही कळस आहे.
मुखदर्शन मंदिर
     मंदिराच्या व दीपमाळेच्या मध्ये एक मुखदर्शन मंदिर आहे. त्या मंदिरातून पाहिल्यास थेट मूर्ती दिसते. त्यात पादुका आहेत. ज्यांना मंदिरात प्रवेश करता येत नाही; पण दर्शन घ्यावयाचे असेल तर तेथूनच दर्शन घेण्याची म्हणजे मुखदर्शनाचीही व्यवस्था असावी. याबाबत असेही सांगितले जाते, की ते चांगदेवांचे मंदिर आहे. त्यात पादुका आहेत. चांगदेवांबाबत आख्यायिका सांगितली जाते. ज्या मुक्या मुलाने भैरवनाथांना जेवणाचा आग्रह केला, त्यास प्रसन्न होऊन देवाने वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवाने येथेच थांबावे, अशी विनंती मुलाने केली. त्यामुळे देव या ठिकाणी थांबले व सर्व भक्तगण प्रथम भक्ताचे, म्हणजेच त्या मुक्या मुलाचे (चांगदेव) दर्शन घेतील व नंतर माझ्या दर्शनाला येतील, असे भैरवनाथांनी सांगितले. त्यामुळे सर्वप्रथम भाविक चांगदेव मंदिरात पदुकांचे दर्शन घेतात व नंतर भैरावानाथांच्या दर्शनाला जातात, असे सांगितले जाते; परंतु सोनारीलाही भैरवनाथांचे मंदिर असेच आहे. तेथेही मुखदर्शन व्यवस्था याचप्रमाने आहे. यावरून, हे मंदिर मुखदर्शनासाठी असावे, याला पुष्टी मिळते.
दीपमाळ
     मंदिराच्या समोर सुशोभित दीपमाळ आहे. खालील बाजुस रुंद व वर रुंदी कमी गेलेली आहे. उंच असलेल्या या दीपमाळेस वर जाण्यासाठी चार रांगेत दगडी पायर्या आहेत. एका रांगेत अठरा, दुसर्या रांगेत एकोणीस, तिसर्या रांगेत वीस, तर चौथी रांग अपूर्ण असून, ती फक्त आधार म्हणून केलेली दिसते. तिला सात पायर्या आहेत. अशा एकून चौसष्ट पायर्या या दीपमाळेस आहेत. वरच्या भागात दगडी दिवा आहे. प्रत्येक यात्रेत या दिव्यत तेल घालून तो तेवत ठेवला जातो. त्यासाठी भक्त तेल देतात.
कल्पवृक्ष (कडूलिंबाचे चमत्कारिक झाड)
     भैरवनाथ मंदिराजवळ कडूनिंबाचे मोठे झाड आहे. त्याला विष्णू किंवा कल्पवृक्ष असे संबोधले जाते. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पाला कडू लागत नाही. तो काहीसा तुरट लागतो. या झाडास दरवर्षी बहर येतो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मंदिरात याच पाल्यावर झोपिवले जाते. अशा प्रकारचा वृक्ष परिसरात इतरत्र कोठेही आढ़ळत नाही, हे विशेष!
बाबांच्या पादुका
     भैरवनाथ मंदिराजवळच पश्चिमेस २६ पादुका आहेत. या सर्व नि:स्पृह बाबांच्या आहेत. जवळच नि:स्पृह बाबांची गादी आहे. तेथे भक्त दर्शन घेतात. या गादीवरील बाबांच्या स्वर्गवासानंतर तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पादुका तयार केल्या जातात. ते समाधिस्थळ म्हणून मानले जाते. २६ पादुकांवरून हे मंदिर २६ पिढ्यांपूर्वीचे असल्याचा दाखला मिळतो.




मोफत अन्नदान उपक्रम
     पुरातन कथेप्रमाने श्री कालभैरवनाथ राक्षसांचा संहार करण्यासाठी जात असताना येथे थांबले. येथील गुराखी मुलांतील मुक्या मुलाने नाथांना जेवण दिले. त्यावेळी तृप्त होउन नाथांनी त्या मुलाला वाचा दिली. तो बोलू लागला. त्या मुलाने वर मागितला, की देवाने येथेच थांबावे. त्याप्रमाणे देव येथे थांबले व जो येथे अन्नदान करील, त्याचे दु:ख दूर होइल. घरात सुखशांती लाभेल, असाही वर दिला. याच कथेचा आधार घेत देवस्थान ट्रस्टने अन्नदानाचा उपक्रम सुरु केला. प्रत्येक रविवारी मोफत भरपूर जेवण दिले जाते. बाजरीची भाकरी, आमटी, कांदा, लिंबू, भात, मिरचीचा ठेचा असे या जेवणाचे स्वरूप असते.

अन्नदानासाठी नावानोंदणी
     हे अन्नदान सर्वांना मोफत असते. ते भाविकांच्याच देणगीतुन होत असते. देवस्थान ट्रस्टकडे सर्व साहित्य उपलब्ध असते. ज्यांना अन्नदान करावयाचे आहे, त्यांनी देवस्थानाकडे फक्त अन्नदानास येणारा खर्च द्यायचा, ट्रस्टचे कार्यकर्ते सर्व कामे करतात. नावनोंदणी केल्यानंतर जेव्हा आपला अन्नदानासठी नंबर येईल, तेव्हा संबंधितांना कळविले जाते. रविवारी दुपारी बारा वाजता महाआरती होते. अन्नदात्याच्या हातात देवासाठी हार, श्रीफळ नैवेद्याचे ताट देऊन वाजतगाजत मंदिरास प्रदक्षिणा घातली जाते. यावेळी अन्नदात्यांच्या हस्ते पूजा व महाआरती होते. मिरवनुकीत अश्व (घोडा) असतो. हा सोहळा प्रेक्षनीय असतो.




























0 comments:

फक्त मिस कॉल वर व्यवसायाची जाहिरात करा तेही ऑटो मेसेज पाठऊन अधिक महितीसाठी क्लिक करा http://autotextsms.com/ फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/
फक्त मिस कॉल वर व्यवसायाची जाहिरात करा तेही ऑटो मेसेज पाठऊन अधिक महितीसाठी क्लिक करा http://autotextsms.com/ फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/

New Post

Labels

 
Back to top!